(अनंत नलावडे)
मुंबई – बुधवारी १८ तारखेला मविआच्या बैठकीत काँग्रेस काहीही दावा करत असली तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस तब्बल १०५ जागा लढवणार असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ८८, तरं उध्दव ठाकरे यांची शिवसेना ९५ जागा लढवण्याचा फॉर्म्युला ठरला असून मुंबईत मात्र ठाकरे यांची शिवसेना २३ जागा लढवेल यावर बैठकीत शिक्कामोर्तबच करण्यात आल्याचे या बैठकीला उपस्थित एका ज्येष्ठ नेत्याने बोलताना सांगितले.
याच बैठकीत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपस्थित नेत्यांनी ठाकरे यांनी अद्याप मुख्यमंत्री पदाचा आपला हट्ट सोडला नसल्याचे स्पष्ट करत, त्यामूळेच आम्ही कमी जागांवर आता तडजोड करण्यास तयार असल्याचे मित्र पक्षांच्या नेत्यांना सांगण्यात आले.
आणखी दोन दिवस हे बैठकांचे सत्र चालणार आहे.खरंतर बैठकीला येण्यासाठीही काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नव्हते. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीकाही केली होती,याची आठवणही या नेत्याने यावेळी करून दिली.
मविआतील नेत्यांनी २८८ जागांचा आढावा घेतला असून त्यामध्ये काँग्रेस विदर्भात मजबूत स्थितीत आहे.तरं लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश हाती न आल्याने उध्दव ठाकरे यांची शिवसेना मुंबईसह कोकणात तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात आपली ताकद दाखवण्याच्या मानसिकतेत आहे.त्यामुळे विधानसभेमध्ये मविआलच बहुमत मिळेल,असे प्रास्ताविक करून बैठकीला सुरूवात झाली.यावेळी काँग्रेसने तब्बल ११५ जागांवर दावा करतानाच केवळ राहुल गांधींच्या आदेशानुसार ते १०५ जागांवर थांबतील,असे काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी ठामपणे स्पष्ट केल्याची माहितीही या नेत्याने दिली.
लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्याने काँग्रेसच्या राज्यातील सर्वच नेत्यांना फार महत्त्व आले असून आता तेही तारखांवर तारखा देत आहेत. त्यामुळेच जागावाटप बैठकीची तारीख,वेळ,ठिकाण आधी कळवूनही काँग्रेसचे नेते वेळेवर पोहोचत.त्यामुळे उध्दव ठाकरे गटाचे प्रमुख नेते खा. संजय राऊत यावेळी स्पष्टच म्हणाले की,काँग्रेस पक्ष सध्या खूपच व्यग्र झाल्याने आम्ही हे सगळे संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले.तरीही ते तारखांमागून तारखा देत आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपली तीव्र नाराजी बोलून दाखवली.
आता पुन्हा एकदा उध्दव ठाकरे आक्रमक……
खरंतर ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेत मुख्यमंत्रिपदासाठी माझाच चेहरा द्यावा,अशी मागणी केली होती. त्यावर प्रचारात ही बाब समोर आणली जाईल,असे त्याचवेळी सांगण्यात आले होते.त्यानंतर लगेच शरद पवारांनीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आताच जाहीर करण्याची घाई नाही, असे स्पष्ट केल्याने त्यावेळी शांत झालेली उध्दव ठाकरे यांची शिवसेना या बैठकीत सुरुवाती पासूनच आक्रमक झाल्याचे दिसून आल्याचा गौप्यस्फोटही या नेत्याने अधिक माहिती सांगताना केला.
…………………………