दहशवाद्यांच्या गळ्यात गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही

0

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर परखड टीका

*मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा बॉम्बस्फोट घडवायचेत का?

बुलढाणा – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ३७० कलम हटवून काश्मिरला दहशवादापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मिरात पुन्हा ३७० कलम बहाल करण्याची भाषा करणाऱ्या फुटीरतावाद्यांच्या गळयात गळे घालणारा काँग्रेस पक्ष खरा देशद्रोही असल्याची परखड टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. या देशविघातक शक्तींना मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का असा सवाल उपस्थित करत देशभक्ती आणि देशद्रोह यांचा भारतीयांनी विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. बुलढाणा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसार कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, काश्मिरमध्ये काही फुटीरवादी गट पुन्हा ३७० कलम बहाल करण्याची भाषा करत आहेत. त्या राष्ट्रद्रोही फुटीरवादी गटाच्या वळचणीला काँग्रेस जात आहे. त्यामुळे काँग्रेस दहशवाद्यांच्या पाठीशी आहे का? देशात आणि राज्यात पुन्हा बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या धोरणांवर संताप व्यक्त केला. देशद्रोही अफझल गुरुचे गोडवे गाणाऱ्या नेत्याला आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्यात येतंय. हा देशद्रोह असल्याचेही टीका मुख्यमंत्री विरोधकांवर केली.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन देशात सकारात्मक बदल घडवत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस नेते परदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत. जनतेला आता राष्ट्रभक्ती आणि देशद्रोह्यांमधला फरक कळला असून जनताच त्यांना त्याची जागा दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

परदेशात जाऊन राहुल गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना दिलेले आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात. हा संविधानाचा आणि डॉ.बाबासाहेबांचा अपमान आहे. महायुती सरकार विरोधात काँग्रेस आंदोलन करते मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने आता राहुल गांधी यांच्या घरासमोरच आंदोलन करावे, असे ते म्हणाले. काँग्रेसचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ज्या प्रकारे राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जात असून त्याचप्रमाणे बहीण सुरक्षा योजनाही राबवण्यात येत आहे. महिला अत्याचाराच्या घटनेतील दोषींना जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत सरकार गप्प बसणार नाही. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सरकार अतिशय कडक पावलं उचलत असून महिला सुरक्षेला प्राधान्य देत आहे, असे ते म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech