मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. संजय पांडे यांच्यासोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खासदार वर्षा गायकवाड यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्याची भूमिका मांडली आहे म्हणूनच ४०० पार चा नारा दिलेल्या भाजपाला २४० वर रोखले, यात महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे योगदान आहे. मागील काही वर्षात महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला ठेच पोहचवण्याचे काम केले जात आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. सत्ताधारी पक्षातील नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत पंतप्रधान व विरोधी पक्ष नेत्याचे पदही तितकेच महत्वाचे आहे, त्या पदाचा मान राखला पाहिजे पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

महाराष्ट्रातील युती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. लाडका मित्र योजना जोरात सुरु आहे. काँग्रेस पक्षात लोकशाही आहे आणि काँग्रेसने भारत जोडण्याचे काम केले आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अनेकजण काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मविआचे सरकार आणण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहनही खासदार वर्षा गायकवाड यांनी केले.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यावेळी म्हणाले की, काँग्रेस हा एक परिवार असून १४० वर्षांचा जुना व अनुभवी पक्ष आहे. खासदार राहुल गांधी यांनी डरो मतचा संदेश दिला आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. काँग्रेस पक्षाच्या विचार महत्वाचे असून अनेक पक्षातून ऑफर असतानाही काँग्रेसमध्येच प्रवेश करण्याचा निर्णय पक्का होता असे सांगितले. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी मंत्री अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व्ही बी व्यंकटेश, मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, खजिनदार संदीप शुक्ला, अखिलेश यादव, अशोक गर्ग, इब्राहिम भाईजान, मोहसिन हैदर, आदी उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech