मुंबई – काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून झालेल्या अवमानकारक विधानांच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी राज्यभरात रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन केले.राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना भाजप-शिवसेनेने आवर घालावा आणि त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी,अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.तर भाजपचे राज्यसभा खा. केंद्रिय राज्यमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याची गरज असल्याचे म्हटले होते. काँग्रेसने या विधानांवर आक्रमक होत आज राज्यभर आंदोलन छेडले.मीरा भाईंदर येथे कोकण विभागीय कार्यकर्त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित आढावा बैठकीस आलेले काँग्रसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी मंत्री आ.सतेज पाटील,हुसेन दलवाई,आ.भाई जगताप यांच्यासह नेते,पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन करत भाजपच्या तालिबानी वृत्तीचा जोरदार निषेध केला.तर मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथीस घरासमोर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा.वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षातील नेतेच धमक्या देत असल्याने त्या गंभीरपणेच घेतल्या पाहिजेत.कारण राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढत असल्याने व नरेंद्र मोदी आणि आरएसएस विरोधात लढणारे ते देशातील एकमेवच असून त्यांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.त्यामुळेच घाबरलेला भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचे नेते त्यांना सातत्याने जीवघेण्या धमक्या देत आहेत,असा थेट आरोपही चेन्नीथला यांनी यावेळी बोलताना केला.
केंद्र सरकारने देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले असताना राहुल गांधी यांनी पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलवून टाकले.देशाच्या संविधानासाठी,लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी यात्राही काढली. राहुल गांधी हे संयमी नेते आहेत, पण भाजप त्यांच्या जीवावर उठले आहे. त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. मात्र काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही,असा थेट इशाराच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिला.दरम्यान पुणे,नाशिक,जळगाव, छत्रपती संभाजीनगर,नागपूर आणि नाशिक येथेही आज काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेस कडून सांगण्यात आले.