विजय वैद्य यांची वसंत व्याख्यानमाला यापुढेही सुरुच राहील ; जय महाराष्ट्र नगर वासियांची ग्वाही

0

 

मुंबई,(प्रतिनिधी) : जय महाराष्ट्र नगर येथील सामाजिक, शैक्षणिक संस्थांची मुहूर्तमेढ रोवणारे आणि गेली ४२ वर्षे अखंडपणे, अव्याहतपणे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु ठेवणारे समाजसेवेचे मानबिंदू, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य हे आज शरीराने जरी आपल्यात नसले तरी सूर्य चंद्र असेस्तोवर त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील आणि त्यांनी बेचाळीस वर्षांपूर्वी सुरु केलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यापुढेही अखंडपणे सुरु राहील, अशी ग्वाही जय महाराष्ट्र नगर वासियांनी दिली. विजय वैद्य यांनीच सुरु केलेल्या आणि ते उत्सव प्रमुख असलेल्या एकता विनायक चौकातील उपनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे स्व. विजय वैद्य यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत उपस्थित सर्वच वक्त्यांनी विजय वैद्य यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांनी सामाजिक सेवेचे उभे केलेले सर्वच प्रकल्प याही पुढे सुरु ठेवणे, तितक्याच जोमाने पुढे नेणे, हीच खऱ्या अर्थाने त्याना श्रद्धांजली ठरेल, अशाही भावना वक्त्यांनी व्यक्त केल्या. विजय वैद्य यांच्या कार्याचा उजाळा दिला. माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी, श्री. विनोद घोसाळकर, श्री. विश्वनाथ नेरुरकर, कवि विसुभाऊ बापट, उपनगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष राजन सावंत, चेतन कदम, राजू देसाई, अभिजित राणे, सुरेश परांजपे, मीना इंगळे, नीलिमा जांगडा, सचिन वगळ, मनोहर देसाई, रोहिणी चौगुले, शर्मिला शिंदे, दत्ताराम घुगे, प्रमोद तेंडुलकर, योगेश त्रिवेदी आदींनी यावेळी आपापल्या भावना व्यक्त केल्या. विजय वैद्य यांचे चिरंजीव वैभव आणि विक्रांत हे या सभेस उपस्थित होते. विजय वैद्य यांनी दुःख करु नका, मला आनंदाने निरोप द्या, असे सांगितले असल्याने ही शोकसभा न म्हणता स्मृती सभा असे संबोधावे, असे यावेळी प्रा. नयना रेगे यांनी सूत्रसंचालन करतांना सांगितले. या सभेच्या आयोजनासाठी मिलिंद कोळवणकर, बिपिन सावंत, शाम पंडित, हेमंत पाटकर, सचिन वगळ आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.*

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech