मुंबई – विधानसभा निवडणुकीत जागा वाटपासाठी एकीकडे महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मविआमध्ये मुख्यमंत्री पदावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यावरून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.
काल काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार, असे विधान केले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा दावा करू नये अजून जागावाटप बाकी आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाही तर कुणाला मोठा भाऊ आणि लहान भाऊ अशी खुमखुमी असेल तर ती महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत उतरवून दाखवेन, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्या या विधानाने महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे.