छत्रपती संभाजीनगर – अल्पसंख्याक समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक विकासासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाला 500 कोटी रुपयाची भरीव आर्थिक तरतूद केली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा व प्रशिक्षण देण्यात येईल, असे राज्याचे अल्पसंख्यांक व औकाफ, सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे जाहीर केले.
हज हाऊस येथील सभागृहात मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. अल्पसंख्यांक आयुक्त मोहीन ताशिलदार, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री मगदूम, यांच्यासह लाभार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशा अभावी थांबू नये यासाठी कर्ज योजना ,परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, उद्योग कर्जपुरवठा ,बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कर्ज पुरवठा, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थि, नागरिक यांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले.
त्यांनी पुढे सांगितले की,एक दिवसीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया अर्जासाठी लागणारे कागदपत्रे याबाबतचे प्रशिक्षण व माहिती देण्यात येत आहे याचा लाभ अल्पसंख्यांक समाजातील सर्व घटकांनी घ्यावा. अल्पसंख्याकांना शिक्षण देणाऱ्या मदरशांना देण्यात येणारे अनुदान दोन लाखावरून वाढ करून दहा लाख करण्याचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी दिले.
वक्फ बोर्ड मध्ये मदरशांची नोंदणी व आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी कर्ज घेतले असेल आणि या शिक्षणादरम्यान त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचे शैक्षणिक कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले.पाच जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात वसतिगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. यात छत्रपती संभाजी नगर मध्ये नारेगाव , नाशिक जिल्हा मालेगाव, नागपूर, मुंबई येथे वसतिगृह सुरू येणार असल्याचेही यावेळी सांगितले. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूरीचे प्रमाणपत्र वाटप पालकमंत्री सत्तार यांनी केले.