नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी आज, शनिवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दिवंगत शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज यांच्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आहेत. राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यावेळी आतिशींसोबतच सौरभ भारद्वाज, गोपाल राय, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत या चौघांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदी आतिशी यांची निवड करण्यात आली. यानंतर आतिशी यांनी आज 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या प्रसंगी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यासह आप नेत्या आतिशींचे आई-वडील तृप्ता वाही आणि विजय सिंह हे देखील राज निवास येथे उपस्थित होते. आतिशी मार्लेना पंजाबी राजपूत कुटुंबातून आहेत. त्यांचा जन्म 8 जून 1981 रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील विजय सिंह हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
आतिशी यांचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल स्कूल नवी दिल्ली येथे झाले. त्यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली. काही वर्षांनी त्यांनी ऑक्सफर्डमधून शैक्षणिक संशोधनात दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांनी मध्य प्रदेशातील एका गावात 7 वर्षे सेंद्रिय शेती आणि प्रगतीशील शिक्षण प्रणालींमध्ये अभ्यास केला. तिथे अनेक संस्थांसोबत त्यांनी काम केले आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. तिथेच त्या प्रथम काही आप पक्षाच्या सदस्यांना भेटल्या होत्या. त्यानंतर 2020 पासून त्या दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाल्यात. कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर 2023 मध्ये त्यांना मंत्री बनवण्यात आले. त्यानंतर अवघ्या महिनाभरात त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली.