राज ठाकरे यांचा सरकारला सज्जड इशारा…!
मुंबई – अनंत नलावडे
फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत किमान महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही,असा सज्जड इशारा राज ठाकरे यांनी रविवारी एका पत्रकान्वये राज्य सरकारला दिला.त्याचवेळी पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शितच का होऊ दिले जातात? असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक असले तरी पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही.कारण हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे,अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं,त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? अशी सडेतोड विचारणा करत,महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की, या आपल्या इशाऱ्याचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
या आधी असे प्रसंग जेंव्हा आले होते तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा रिलीज करण्याच्या भानगडीत पडू नका.कारण हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपासच नवरात्रौत्सव सुरु होणार आहे.अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही.आणि तशीच इच्छा राज्याचे मुख्यमंत्री,गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार. आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे, असे इशारेवजा आवाहनही ठाकरे यांनी राज्य सरकारला केले.
त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं.कारण ज्या मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या,तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. त्यामुळे कुठल्या तरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा असून आपले सरकारही त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे, असा विश्वासही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात शेवटी व्यक्त केला.