मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसेलच, पण निवडणुकीत पक्षाचा सुपडा साफ होईल, असा दावा करतानाच जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मी महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. मी त्यांचा प्रचारही करणार असल्याचेही म्हटले आहे. मलिक यांनी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या बैठकीनंतर मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मलिक पुढे म्हणाले, या निवडणुकीत उद्धव ठाकरे सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. मी त्यांचा प्रचारही करणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा देशाच्या राजकीय परिदृश्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहे. राज्यातील निवडणुकांचे निकाल भाजपच्या तिजोरीत शेवटचा खिळा ठोकतील. मलिक आणि ठाकरे यांच्यात काय बोलणे झाले, याबाबत विचारले असता ते म्हणाले, माझ्या माहितीनुसार भाजपचा पराभव होत आहे, असे मी म्हटले आहे. महाविकास आघाडी जिंकेल. काही तडजोड करा पण विधानसभा निवडणुकीत एकत्र राहा, असे मी ठाकरेंना सांगितले. मी त्यांना आश्वासन दिले की मविआ सरकार स्थापन करेल.