मुंबई – गेल्या काही दिवसांपासून देशात तिरुपती बालाजीच्या प्रसादातील भेसळीवर गदारोळ होत असताना आता मुंबईतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपुर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अशात मंदिराच्या प्रशासनाने या आरोपांवर उत्तर देत, हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. मंदिर प्रशासनाने हे सर्व आरोप नाकारले असले तरी, भाविकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे तिरुपती बालाजीच्या प्रसादातील कथित भेसळीनंतर सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदीर आढळ्याच्या दाव्यामुळे भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रसादाची पाकिटे भरुन ठेवलेल्या कॅरेटमध्ये एका कोपऱ्यात प्लास्टीक पिशवीवर काही उंदीर असल्याचे दिसत आहेत.
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर शिवसेनेचे आमदार आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी आरोप नाकारले आहेत. या प्रकरणावर बोलताना सदा सरवणकर म्हणाले, “सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ खोट आहेत. कारण आम्ही आतापर्यंत कायम स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. आमचा परिसर स्वच्छ असतो. जिथे प्रसाद करतो तिथे स्वच्छता असते. सर्व प्रसादाचे पॅकिंग हे मशिनवर होते. त्यामुळे असा प्रकार घडणे शक्य नाही. याबाबत आम्ही चौकशी केली असून, यात काहीही तथ्य नाही.”