नागपूर – विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखणे, हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असेल. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जमिनीवर उतरुन काम करा. केवळ कार्यकर्त्यांवर विसंबून राहू नका. आपल्याला प्रत्येक बुथवर 10 टक्के मतदान वाढवायचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा, असे आदेश भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी दिले. शाह यांनी बुधवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
अमित शाह पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दगा दिला आहे. त्यामुळे आपल्याला त्यांनाही रोखायचे आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवण्यासाठी विदर्भात काँग्रेसला पराभूत करण्याची आवश्यकता आहे. लोकसभा निवडणुकीत आपली कामगिरी चांगली झाली नाही. पण कार्यकर्त्यांनी निराश होण्याची गरज नाही. भाजपने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या एकूण जागांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त सीट जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपची विदर्भातील कामगिरी महत्त्वाची आहे. विदर्भात चांगले यश मिळते तेव्हा भाजपची सत्ता येते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात समन्वयावर भर द्या, असे अमित शाह यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले. अमित शाह यांनी विधासनभा निवडणुकीत विदर्भात 45 आणि मराठवाड्यात 30 जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले आहे.