अकोला – महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेस बाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिवसेना काँग्रेस सोबत होती म्हणून एकचे तेरा झाले. आमदार देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसकडून ही याचं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आमदार नितिन देशमुख यांनी आपली चूक दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळाले. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) या पक्षानी एकत्र निवडणूक लढवत महायुतीची पिछेहाट केली. या निवडणुकीत राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला. 13 जागा काँग्रेसला जिंकता आल्या. अकोल्यात यावरूनच आता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेस बाबत केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आले आहे. माध्यमातून बोलताना आमदार नितीन देशमुख यांनी हे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेमुळे राज्यात काँग्रेसच्या एका जागेच्या तेरा जागा झाल्या असा दावा आमदार देशमुख यांनी केला आहे. तर दुसरीकडे यावरून काँग्रेसनेही आमदार देशमुख यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आमदार नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. एकंदरीतच आमदार नितीन देशमुख यांनी काँग्रेस बाबत केलेल्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतही महायुतीप्रमाणे काही नेत्यांमधील आरोप- प्रत्यारोप चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
आमदार देशमुखांना आत्मचिंतनाची गरज – काँग्रेस प्रदेश सचिव प्रकाश तायडे
दरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तायडे म्हणाले, लोकसभेत महाविकास आघाडीच्या युतीमुळे काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष झाला.. एवढी ताकद महाविकास आघाडीत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ने 17 जागा लढवून 13 जागा जिंकल्या तर शिवसेनेने 23 जागा लढवून 9 जागा जिंकल्या. महाविकास आघाडी ही काळाची गरज असल्याचे तायडे यांनी म्हटलं आहे. मात्र कुणी जर असं म्हणत असेल खासकरून आमदार नितीन देशमुख की शिवसेनेच्या भरवश्यावर काँग्रेसचे तेरा झाले ही चूक त्यांनी दुरुस्त करावी हा विरोध त्यांनी दुरुस्त करावा. असेही तायडे म्हणाले. तर महाविकास आघाडीत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत 17 जागा लढवून 13 जागी विजय मिळवला हा स्ट्राईक रेट आहे. काँग्रेसचा आणि शिवसेनेने 23 जागा लढवून फक्त 9 जागा जिंकल्या हा स्ट्राईक रेट आहे. काँग्रेसच्या विजयाचे आत्मचिंतन देशमुख यांनी करावं असा टोलाही तायडे यांनी लगावला आहे. तर नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एक नंबर आल्याचेही ते म्हणाले.