सोलापूर – सोलापूरच्या बहुप्रतीक्षित नागरी विमानसेवेला मुहूर्त अखेर मिळाला असून येत्या २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सोलापूरच्या नागरी विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात विविध विकासकामांच्या शुभारंभासह भूमिपूजनांचा धूमधडाका सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून सोलापूर विमानसेवेचा शुभारंभ घाईगडबडीत उरकला जात आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी १५ जून २०१६ रोजी उडान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातच सोलापूर विमानसेवेला मंजुरी दिली होती. परंतु त्या अनुषंगाने सोलापूरच्या छोटेखानी विमानतळावर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने उडान योजना सोलापूरकरांसाठी कागदावर राहिली होती. त्यानंतर सुमारे सात वर्षे विमान सेवेबाबत फारशा हालचाली झाल्या नव्हत्या. अलीकडे दोन वर्षांत विमानसेवेची मागणी जोर धरू लागली. परंतु विमानसेवेसाठी विविध ३६ अडथळे असल्यामुळे हा प्रश्न रखडला होता.