इस्त्रायल : मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला

0

तेलअवीव – इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयावर आज, बुधवारी (25 सप्टेंबर) बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने केला आहे. हिजबुल्लाने मोसाद मुख्यालयावर कादर-1 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले मात्र यामुळे मोसादच्या मुख्यालयाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. इस्रायलने ‘डेव्हिड स्लिंग’ नावाच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे हे क्षेपणास्त्र हवेत नष्ट केल्याची माहिती इस्त्रायली सैन्य सूत्रांनी दिली. इस्रायलने सोमवारी केलेला हल्‍ला आणि यानंतर आज लेबनॉनचा प्रतिहल्‍ला यामुळे आता युद्धाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहेत.

इस्त्रायलने केलेल्‍या हल्‍ल्‍यात लेबनॉनमध्ये 500 हून अधिक जण ठार झाले आहेत. दरम्‍यान, हिजबुल्लाहने बुधवारी सांगितले की, त्यांनी तेल अवीवजवळील इस्रायली गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयाला लक्ष्य करत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. जवळपास वर्षभर चाललेल्या युद्धानंतर हिजबुल्लाहने पहिल्यांदाच बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा केला आहे. इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे की, हिजबुल्लाहने डागलेले क्षेपणास्त्र आयर्न डोमने रोखण्यापूर्वी प्रथमच राजधानी तेल अवीवमध्ये पोहोचले. हिजबुल्लाहने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, बुधवारी सकाळी 6.30 वाजता तेल अवीवच्या बाहेरील मोसाद मुख्यालयावर ‘कादर-1’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. गाझामधील लोकांच्या समर्थनार्थ आणि लेबनॉन आणि तेथील लोकांचे रक्षण करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

लष्करी विश्लेषक रियाद काहवाजी यांनी सांगितले की, हिजबुल्लाहने इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची ही पहिलीच वेळ आहे. या क्षेपणास्त्रांची निर्मिती इराणमध्ये झालेली आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यापासून हिजबुल्ला आणि इस्रायलमध्‍येही संघर्ष सुरू आहे. हमासच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये सुरू झालेल्या युद्धात हिजबुल्लासह मध्यपूर्वेतील इतर इराण समर्थित दहशतवादी गट सामील झाले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech