नवी दिल्ली – नौदलप्रमुख अडमिरल दिनेश के त्रिपाठी 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत ग्रीसच्या चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. ही भेट भारत आणि ग्रीस यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. दोन्ही देशातील नौदल सहकार्य वृद्धिंगत करण्यावर यात भर दिला जाणार आहे.
नौदलप्रमुख या भेटीत ग्रीसचे उप संरक्षण मंत्री तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांच्या भेटी घेतील. यात संरक्षण क्षेत्रातील विविध सहकार्याचे पैलू, विशेषतः सागरी सुरक्षा,संयुक्त प्रशिक्षण उपक्रम आणि दोन्ही नौदलात भविष्यातील परिचालन सहकार्य संधी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही भेट भारत आणि ग्रीसमधले दृढ नौदल संबंध अधोरेखित करणारी असून अडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या ग्रीस दौऱ्यामुळे दोन्ही नौदलांमधील मैत्री व सहकार्याचे बंध अधिक दृढ होतील. तसेच परस्पर हिताच्या क्षेत्रात सहयोग वाढण्याची सुनिश्चिती होईल.