पुतळा भ्रष्टाचार आरोप प्रकरणी पोलिसांच्या नोटीसीला आ. वैभव नाईक यांचे उत्तर

0

सिंधुदुर्ग – मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व अधिकाऱ्यांवर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांनी आमदार वैभव नाईक यांना त्यांनी केलेल्या आरोपांबाबत उपलब्ध पुरावे चार दिवसात सादर करून तपासकामी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. त्याबाबत आमदार वैभव नाईक तातडीने पोलिसांना सहकार्य करत नोटिसीला उत्तर दिले आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना इमेल केले आहे.

आमदार वैभव नाईक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आपण माझ्याकडे माहिती मागविली आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे काम नौदलाने केले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीर केले आहे. मात्र पुतळा सुशोभिकरण आणि नौदल दिनाचा खर्च अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांनी २.५ कोटी रु., आणि जिल्हा नियोजन सिंधुदुर्ग यांनी ५.५ कोटी रु. खर्च केला असल्याची लेखी माहिती मला सबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे नौदलाचे हे काम असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली, आणि जिल्हा नियोजन सिंधुदुर्ग यांनी केलेला खर्च कुठे गेला? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तरी नौदल दिनानिमित्त नौसेनेने केलेल्या खर्चाचा तपशील देण्याबाबत नौसेना अधिकाऱ्यांशी मी पत्रव्यवहार केला आहे. नौसेनेने अद्याप याबाबत माहिती दिलेली नसून नौसेनेकडून सदर माहिती मिळताच त्याबाबतची माहिती आपल्याला देण्यात येईल.

त्याचबरोबर मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात याबाबत संतापाची भावना आहे. हा अत्यंत संवेदनशील विषय असून महाराष्ट्रात घडणाऱ्या अशा संवेदनशील विषयात पोलीस अधिकाऱ्यांकडून केलेल्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवली जाते. मात्र राजकोट पुतळा प्रकरणातील केलेला तपास, अटक केलेले आरोपी जयदीप आपटे, चेतन पाटील यांनी दिलेले जबाब, अन्य संशयित आरोपींना अटक कधी होणार याबाबत कोणतीच माहिती प्रसारमाध्यमांना आणि जनतेला आपण दिलेली नाही. तरी सदर प्रकरणाबाबत केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती जनतेसाठी लवकरात लवकर जाहीर करावी. असे पत्रात म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech