रियारी हल्ल्यात आढळले लश्कर-ए-तोयबा कनेक्शन
जम्मू – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज, शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील 7 ठिकाणी शोध मोहीम सुरू केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरातील रियासी येथे 9 जून रोजी झालेल्या जिहादी दहशतवादी हल्ला प्रकरणी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचे कनेक्शन आढळले असून याप्रकरणी ही छापेमरी सुरू आहे.
जम्मू-काश्मीरच्या कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी 9 जून रोजी गोळीबार सुरू केला. शिव खोरी मंदिराकडून कटरा येथे जाणारी बस रियासी येथील पौनी भागातील तेरायथ गावाजवळ गोळीबाराचा फटका बसल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन खोल दरीत कोसळली. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी झाले आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर 17 जून रोजी या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता.
या प्रकरणात, आतापर्यंत राजौरीतील हकम खान या व्यक्तीला दहशतवाद्यांना अन्न, जागा आणि इतर मदत पुरवल्याबद्दल तसेच हल्ल्यापूर्वी या भागाची गुप्त माहिती मिळविण्यात मदत केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शिव खोरी दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात आज सकाळपासून एनआयएचे अनेक पथक राजौरी आणि रियासी जिल्ह्यात शोध घेत आहेत.एनआयएने अटक केलेल्या संशयिताच्या चौकशीत या हल्ल्यामागे बंदी घातलेली दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. बस हल्ल्यात किमान 3 दहशतवादी सहभागी असल्याची शक्यता एनआयएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हकम खान उर्फ हकीन दीनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, एनआयएने 30 जून रोजी हायब्रीड दहशतवादी आणि त्यांच्या ओव्हरग्राउंड ऑपरेटिव्हशी संबंधित 5 ठिकाणांचा शोध घेतला होता. त्याच्या चौकशीत सैफुल्लाह (उर्फ साजिद जट्ट) आणि अबू कताल (उर्फ कताल सिंधी) या लश्कर-ए-तोयबाच्या 2 पाकिस्तानी कमांडरचा सहभागही उघड झाला आहे, यांनीच हल्लेखोरांसाठी हँडलर म्हणून काम केले होते.