मुंबई – बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहावर दफन करण्यास ठाणे ते बदलापूर ठिकठिकाणी स्थानिक स्तरावर विरोध होत होता. तरी पोलिसांनी रविवारी अखेर सहा दिवसांनी स्थानिकांचा विरोध असतानाही मोठ्या पोलीस बंदोबस्तात उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत मृतदेह दफन केला. अक्षयच्या मृत्यूला सहा दिवस झाले होते. तरीही त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नव्हते. त्याचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली होती. त्यामुळे अंत्यविधी करण्याचा रविवार हा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी स्थानिक नागरीक, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांकडून विरोध होत होता. अशातच उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांकडून अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्यात आला. मात्र, येथेही स्थानिकांकडून विरोध झाला. अक्षय शिंदेच्या दफन विधीसाठी खोदलेला खड्डा येथील कार्यकर्त्यांनी बुजवला होता, त्यानंतर, पोलीस बंदोबस्तात पुन्हा हा खड्डा खोदण्यात आला. दरम्यान, पोलीस आणि रुग्णालय प्रशासनानं रविवारी अक्षयच्या आई-वडिलांना त्याचा मृतदेह ताब्यात दिला. मृतदेह ताब्यात घेऊन शववाहिका कळवा येथून उल्हासनगर दिशेनं गेली. उल्हानगरमध्ये कडक पोलीस बंदोबस्तात अक्षयच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. मात्र, येथेही स्थानिकांनी स्मशानात धाव घेत अंत्यविधीला विरोध केला होता.