नवी दिल्ली – भारत आणि कझाकस्तान या देशांच्या सेनांच्या काझिंद-2024 या आठव्या संयुक्त लष्करी सरावाला आज उत्तराखंडमधील औली येथील सूर्य परदेशी प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झाली. दिनांक 30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत हा सराव होणार आहे. वर्ष 2016 पासून दर वर्षी दोन्ही देशांच्या लष्करांच्या सहकार्याने काझिंद नामक संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात येतो. गेल्या वर्षी 30 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कझाकस्तान येथील ओटार येथे हा संयुक्त सराव पार पडला होता.
लष्कराच्या कुमाऊ रेजिमेंटतर्फे इतर शस्त्रास्त्रे आणि सेवा यांसह भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तुकडीत भारतीय सशस्त्र दलांतील 120 जवानांसोबत भारतीय हवाई दलातील जवानांचा देखील समावेश आहे. कझाकस्तानच्या पथकाचे प्रतिनिधित्व मुख्यतः पायदळ आणि वायुदलाची पथके करतील. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर मधील भाग सात अंतर्गत उपपारंपरिक परीदृश्यात दहशतवाद प्रतिबंधक मोहिमा हाती घेण्यासाठी दोन्ही देशांच्या संयुक्त लष्करी क्षमतांमध्ये वाढ करणे हा या संयुक्त लष्करी सरावाचा उद्देश आहे. या सरावादरम्यान निम-शहरी आणि डोंगराळ प्रदेशांतील मोहिमांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
जवानांमध्ये उच्च कोटीची शारीरिक तंदुरुस्ती, मोहिमांसाठी लढाऊ डावपेचांसाठी उपयुक्त कौशल्यांचा सराव आणि सर्वोत्तम पद्धतींचे सामायीकीकरण साध्य करणे ही या सरावाची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. या उपक्रमादरम्यान ज्या लढाऊ कौशल्यांचा सराव केला जाईल त्यात दहशतवादी कृतींना संयुक्त प्रतिसाद, संयुक्त कमांड ठाण्याची स्थापना, गुप्तहेर आणि पाळत संदर्भातील केंद्रांची उभारणी, हेलीपॅड/ विमाने किंवा हेलिकॉप्टर उतरण्याच्या जागांचे संरक्षण, घेराव आणि शोध मोहिमा, काँबॅट फ्री फॉल, विशेष हवाई मोहिमा यांच्यासह ड्रोन्स आणि ड्रोन विरोधी यंत्रणाचा समावेश आहे. काझिंद-2024 या संयुक्त सरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्याला लढाऊ डावपेच, तंत्रे तसेच संयुक्त मोहिमा राबवणे शक्य होईल.