ठाणे – मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकास कामांचे उद्घाटन आज होत आहे, याचा मला आनंद होत आहे. स्वच्छ व सुंदर मीरा-भाईंदर शहर व्हावे, यासाठी शासन विविध विकास प्रकल्प प्रकल्प राबवित आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, भाईंदर पूर्व येथील हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे लोकार्पण, घोडबंदर किल्ला जतन व संवर्धन, निरूपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत लोकार्पण, भाईंदर नवघर येथील तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण, काशी गाव जरीमरी तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण, शासन निधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, रवींद्र फाटक, 145 मिरा- भायंदर विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर, मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त डॉ.संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, शहर अभियंता दीपक खांबित, उपायुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त प्रसाद शिंगटे, उपायुक्त संजय दोंदे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आपल्या मनोगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, प्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतून मीरा भाईंदर मध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत आणि ते पूर्णही होत आहेत. मीरा-भाईंदर मधील लोकप्रतिनिधी सर्व संस्कृती जपून सर्व धर्मियांना सोबत घेऊन चालत आहेत. मिरा भाईंदर हे मुंबई आणि ठाण्याच्या मध्यभागी आहे. त्यानुषंगाने येथील विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या घरांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशा सूचनाही दिल्या. चोरी झालेले दागिने संबंधितांना परत मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाचेही विशेष अभिनंदन केले.