श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला विपुल कदम ला सीट दिली तर, त्याचा पराभव नक्की -रामदास कदम

0

रत्नागिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होताच त्यांच्या उमेदवारीला शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी विरोध केला आहे. कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघ हा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंद झाला आहे. कारण, गुहागरमधून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी भेटायला गेले होते.

यावेळी गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. मात्र, या उमेदवारीला रामदास कदम यांनी स्पष्ट शब्दात विरोध केला आहे.जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटतं नाही. अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल, अशा शब्दात रामदास कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध केला आहे. नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट दिली तर, त्याचा पराभव नक्की असल्याचंही कदम यांनी स्पष्टच सांगितलं. तसेच, विपुल उमेदवार असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा, पण मी गुहागर विधानसभा मतदार संघात पाय ठेवणार नाही, असेही रामदास कदम यांनी परखडपणे बोलून दाखवले. दरम्यान, शिंदे गटाकडून पितृपक्ष संपल्यानंतर विपुल कदम यांची उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, मात्र, ही बातमी बाहेर येताच विपुल कदम हे कामाला लागल्याचे दिसत आहे. कारण, विपुल कदम यांच्याकडून गुहागरमध्ये ‘धर्मवीर-2″ या चित्रपटाचे मोफत खेळ आयोजित करण्यात आले आहेत. विपुल कदम यांच्याकडून शहरात याचे फलक लावून जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. यानिमित्ताने विपुल कदम हे गुहागरमध्ये पूर्णपणे सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech