बदलापूर : शाळेच्या संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0

मुंबई – ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार झालेल्या शाळेच्या संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय. याप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यापूर्वीच चकमकीत मारला गेलाय. तर शाळा संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. बदलापूर येथे ऑगस्ट महिन्यात एका शाळेत 2 चिमुकलींवर अत्याचार झाला होता.ज्या शाळेत हा किळसवाणा प्रकार घडला, त्या शाळेचे अध्यक्ष आणि विश्वस्तांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी आज मंगळवारी 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. बदलापूर घटनेनंतर पोलिसांनी संस्था चालकांविरोधातदेखील पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस अद्याप ट्रस्टींना अटक केलेली नाही. ट्रस्टींची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे‌. बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे मुंबई

उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत स्यु मोटो याचिका दाखल करून घेतली, त्यांच्यावरदेखील सुनावणी सुरू आहे. न्यायाधीशांनी पोलिसांना अक्षयने खेचले ते पिस्तुल होते की रिव्हॉल्व्हर होते..?असा पहिला सवाल केला. यावर सरकारी वकिलांनी ते पिस्तूल होते असे सांगताच न्यायाधीशांनी दुसरा प्रश्न केला. अक्षय शिंदेच्या डोक्यातच का गोळी मारण्यात आली. पोलीस गोळी डोक्यात मारतात की पायावर ? असे सवाल न्यायालयाने विचारले. जर 3 गोळ्या झाडल्या तर उर्वरित 2 कुठे गेल्या? तब्बल 4 पोलीस एका व्यक्तीला नियंत्रित करू शकत नव्हते का ? असा सवाल करत ज्या पोलिसाला गोळी लागली त्याचा लागलेली गोळी आरपार गेली की घासून गेली, असाही सवाल न्यायाधीशांनी केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech