मुंबई – पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेचं नवं वेळापत्रक १२ ऑक्टोबरपासून लागू होणार असून, या अंतर्गत १२ नव्या फेऱ्यांची सुरुवात होणार आहे. सध्या सुरु असलेल्या ६ फेऱ्यांसह १० लोकल गाड्यांचे डबे १२ ऐवजी १५ करण्यात येणार आहेत. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या १३९४ वरून १४०६ वर जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
नव्या फेऱ्यांचा समावेश:
– विरार ते चर्चगेट: एक फास्ट लोकल
– डहाणू रोड ते विरार: दोन स्लो लोकल
– अंधेरी, गोरेगाव, बोरिवली ते चर्चगेट: एक स्लो लोकल
– चर्चगेट ते नालासोपारा: एक फास्ट लोकल
– चर्चगेट ते गोरेगाव: दोन स्लो लोकल
– चर्चगेट ते अंधेरी: एक स्लो लोकल
– विरार ते डहाणू रोड: दोन स्लो लोकल
सहाव्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात : पश्चिम रेल्वेने मालाड स्थानकापर्यंत सहाव्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात आणलं आहे. या मार्गिकेच्या उभारणीसाठी राम मंदिर ते मालाड स्थानकादरम्यान लोकल गाड्यांचा वेग तात्पुरता ३० किमी प्रतितास करण्यात आला आहे. या कामामुळे दररोज १५० लोकल फेऱ्या ४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकलचा वेग पूर्ववत होईल.
भविष्यातील सुधारणा : पश्चिम रेल्वेने गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचे काम देखील हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल सेवेच्या कार्यक्षमतेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.