पुणे – शिवसेना फूटीनंतर राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या आमदारांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांनी राजकारण अधिक तापले आहे. ४० पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटावर “५० खोके” म्हणजे पैशांच्या बदल्यात गद्दारी केल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला. संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांमुळे “५० खोके, एकदम ओके” हे घोषवाक्य विरोधकांनी शिंदे गटाला डिवचण्यासाठी वापरले. या पार्श्वभूमीवर, पुण्यात पुन्हा एकदा या घोषणांनी वातावरण तापवलं आहे.
गुरुवारी पुण्यातील निगडी येथे महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती आणि सचिव सहभागी होते. या परिषदेत बाजार समित्यांच्या कामकाजातील सुधारणा, शेतमालाच्या विपणनातील बदल यांवर चर्चा होणार होती. पणनमंत्री अब्दुल सत्तार या परिषदेचं उद्घाटन करण्यासाठी आले होते, मात्र त्यांचा दीड तास उशीर आणि त्यानंतर परिषद सोडून जाण्याच्या निर्णयामुळे नाराजीचा सूर उमटला.
सत्तार परिषदेच्या उद्घाटनासाठी पोहचले असताना, त्यांनी केवळ एका प्रतिनिधीला बोलण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर, त्यांनी सदस्यांना कोणतेही वादग्रस्त विधान टाळण्याचं आवाहन केलं. मात्र, परिषद चालू असताना, सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी जायचं आहे असं सांगून सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावर सभागृहात उपस्थित असलेल्या बाजार समिती सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. “५० खोके, एकदम ओके” आणि “अब्दुल सत्तारांचे करायचं काय, खाली मुंडकं वर पाय” अशा घोषणांनी नाट्यगृहात वातावरण पेटलं. या घोषणांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. शिंदे गटातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि शिवसेनेतील फूट हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. या घडामोडींनी सत्तार यांना अडचणीत आणलं असून, त्यांच्या या कृतीचा निषेध करून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.