रायगड किल्ल्याच्या संवर्धनातून जागतिक वारसामध्ये नाव नोंदले जाईल – संभाजीराजे

0

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड राजधानी करण्याचे का निवडले हे सांगतानाच जागतिक वारसामध्ये रायगडला कसे पुढे नेता येईल असा माझा प्रयत्न आहे. जागतिक वारसामध्ये आपला एकही किल्ला नाही. आपले किल्ले शौर्याचे प्रतिक असतानाही समावेश झालेला नाही. मात्र, रायगड संवर्धनातून जागतिक वारसामध्ये नाव नोंदले जाईल, अशी खात्री युवराज संभाजीराजे यांनी यावेळी दिली. रायगड किल्ल्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्या रायगड किल्ल्यावर झाला त्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्यावेळी सुनिल तटकरे यांनी मला तुम्ही ही जबाबदारी घ्या सांगितले होते आणि मी ती जबाबदारी सांभाळत आहे हे आवर्जून युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी सांगितले.

साम्राज्यासाठी ज्यांनी रक्त सांडले त्यांच्या वंशजांना अनिकेत तटकरे यांनी बोलावले याबद्दल युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी अनिकेत तटकरे यांचे विशेष कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कशासाठी निर्माण केले याचे चिंतन करायला आज लागत आहेत. आजही आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जगात असा राजा कधी झाला नाही. हो मला शिवाजी महाराज व्हायचं आहे असं प्रत्येकाने मनात आणलं पाहिजे असे सांगतानाच आजही त्यांना चिंतन केल्याशिवाय मी बाहेर पडत नाही, असेही युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. गडकोट किल्ल्यांचे काम मी जबाबदारीने करतो आहे. कुणी काय केले याबद्दल मला बोलायचं नाही. अठरापगड आणि बारा बलुतेदारांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहे, असेही युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः च्या धर्मावर प्रेम करायचे पण ते धर्मांध नव्हते. ज्या विशालगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचे संरक्षण केले त्या विशालगडावर हिंदूसह मुस्लिम समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. ते हटवावे अशी मागणी होती. परंतु मी विशालगडावर गेल्यानंतर माझ्यावर टिका झाली याबद्दल दु:ख झाल्याचे युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. चंद्र – सुर्य असेपर्यंत जगाच्या पाठीवर शिवरायांचा इतिहास जाज्वल्य राहिल – सुनिल तटकरे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड देशाची अस्मिता आणि शौर्याचे प्रतिक आहेत. चंद्र – सुर्य असेपर्यंत जगाच्या पाठीवर शिवरायांचा इतिहास जाज्वल्य राहिल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपले विचार रोहा येथील जाहीर कार्यक्रमात व्यक्त केले.

शिवराज्याभिषेक सोहळ्यात त्या काळातील युग जसे अवतरले तसेच हे आज इथे अष्टप्रधान मंडळातील सरदारांचे वंशज अवतरल्याने आणि छत्रपती संभाजीराजे आल्याने हा सोहळा दिमाखदार झालेला पहायला मिळत असल्याचेही सुनिल तटकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी भोसलेंचे राज्य कधी सांगितले नाही तर हे रयतेचे राज्य असल्याचे सांगितल्याचे आवर्जून सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यातील सर्वात मोठा पुतळा उभारावा हे तीन वर्षांपूर्वी आम्ही स्वप्न पाहिले होते आणि आज ते पूर्ण होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे अशा शब्दात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि संस्कार आपल्या रक्तात भिनले आहेत हे नाकारुन चालणार नाही, असेही अदिती तटकरे म्हणाल्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण युवराज संभाजीराजे छत्रपती आणि रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. श्री धाविर महाराजांच्या रोहा नगरीत ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती व महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कुंडलिका नदीशेजारी भव्यदिव्य सोहळ्याने पार पडले. शिल्पकार महेंद्र थोपटे यांचा युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय अष्टप्रधान मंडळातील सरदारांच्या वंशजाचाही सन्मान यावेळी खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. आ. अनिकेत तटकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी हा राज्यातील सर्वात उंच पुतळा रोहा येथे बनवला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech