नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज, शुक्रवारी आपला सरकारी बंगला सोडला. राजीनामा दिल्यानंतरही ते इथेच वास्तव्याला होते. यापुढे केजरीवाल दिल्लीच्या मंडी हाऊस परिसरातील फिरोजशाह रस्त्यावरच्या 5 क्रमांकाच्या बंगल्यात वास्तव्यास गेले आहेत. हा बंगला केंद्र सरकारने आम आदमी पक्षाचे खासदार अशोक मित्तल यांना आवंटित केला आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला आलिशान बंगला आज, शुक्रवारी सोडला. नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे हा बंगला देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. परंतु, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे केजरीवाल यांना हा बंगला रिकामा करावा लागला. केजरीवालांनी बंगला रिकामा केल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (एक्स) पोस्ट शेअर करण्यात आली. त्यानुसार अरविंद केजरीवाल जोपर्यंत जनता दरबारात त्यांच्या प्रामाणिकपणा सिद्ध करत नाहीत आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवत नाही तोपर्यंत ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांचा नवा पत्ता सध्या 5, फिरोजशाह रोड असा असणार आहे. यापूर्वी केजरीवाल यांना 2014 मध्ये टिळक लेनमध्ये घर देण्यात आले होते. यानंतर ते सिव्हिल लाईन्समधील आलिशान बंगल्यात स्थलांतरित झाले होते. परंतु, आता त्यांना हा बंगला देखील रिकामा करावा लागला आहे. सरकारी निवासस्थान बदलण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.