कोल्हापूर – काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज (शुक्रवार) कोल्हापूरचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाला आहे. त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याचा माहिती मिळत आहे. राहुल गांधी शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या हस्ते कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आणि संविधान सन्मान संमेलनासाठी राहुल गांधी आज कोल्हापुरात येणार होते. मात्र आता सुधारीत नियोजनानुसार राहुल गांधी उद्या (शनिवार ५ ऑक्टोबर) कोल्हापूर दौऱ्यावर येत असून सकाळी ९.३० वा. कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर येथे संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.