राज ठाकरे यांचे आदिवासी आमदारांना खडे बोल
अनंत नलावडे – मुंबई
राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या तीन आमदारांनी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारी मंत्रालयातल्या संरक्षक जाळ्यांवर उड्या मारून केलेल्या सरकारच्या निषेधाच्या कृतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.इतकेच काय त्यांनी या आमदारांना खास ठाकरे शैलीत चांगलेच खडे बोलही सुनावले.
येत्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहितेची घोषणा केंद्रिय निवडणूक आयोग येत्या १३ किंवा १४ तारखेला घोषित करेल ही शक्यता गृहीत धरून राज्यातल्या महायुती सरकारने एका आठवड्यात तीन तीन मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्याचा व त्यात जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी तब्बल ३० ते ३५ किंवा त्यापेक्षा जास्त निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. असे असताना आज आठवड्याचा शेवटचा दिवस शुक्रवार असूनही मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. याचा सुगावा लागल्याने सत्ताधारी पक्षातील तीन आमदारांनी आज आदिवासीच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी मग उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.मात्र तिथेही अपयश आल्याने संतापलेल्या या तिन्ही आमदारांनी दुसऱ्या माळ्यावर येत खाली लावलेल्या संरक्षक जाळ्यात उड्या मारत तिथेच ठिय्या आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या कृतीवर अनेक सरकारी उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तरं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला तीव्र संताप व्यक्त करतं त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले.
राज ठाकरे आपल्या नेहमीच्या खास ठाकरी शैलीत कडाडले. ते म्हणाले,…..अरे म्हणे यांनी निषेध नोंदवला.हा कुठला निषेध?सत्तेशिवाय राहू शकत नाही,असं म्हणणं शक्य नव्हतं,म्हणून ‘जनतेच्या सेवेला सत्ता हवी’,म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना? असे सुनावत सत्ता आली तरी तुम्ही स्वतःचं सोडून कोणाचंही भलं करू शकत नाही हे नक्की.बरं मुळात तुम्ही सत्ताधारी,त्यात पुन्हा संविधानिक पदावर बसलेले, मग तुम्ही निषेध कसले नोंदवताय? मात्र तरीही जर खरंच आदिवासी जनतेबद्दल कळवळा असेल तर,आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी,ज्यांनी आदिवासी हे मागासच राहतील हे पाहिलं त्या सगळ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे,अशा परखड शब्दात या आमदारांवर टिकेचे आसूड ओढले.
महाराष्ट्राच्या राजकारणाचीच सर्कस करून ठेवली आहे यांनी.त्या सर्कशीत तोफेच्या आत जाऊन नंतर तिकडून बाहेर जाळ्यात फेकला जाणारा माणूस आठवतोय? तसं या सगळ्यांचं झालंल असून आता जनतेच्या तोफेच्या तोंडी जायची वेळ आली आहे,मग आपणच स्वतः जाळ्यावर उड्या मारा.म्हणूनच या निमित्ताने माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की यांना तोफेच्या तोंडी जाणं म्हणजे नक्की काय असतं हे या निवडणुकीत दाखवूनच द्या. तुम्हाला गृहीत धरायचं, तुमच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करायच्या आणि नंतर स्वतःपोरकट चाळे करायचे, या सगळ्याला झटका देण्याची,आणि ही विकृत झालेली व्यवस्थाच उलथवून टाकण्याची संधी आजपासून काही आठवड्यात तुम्हाला येणार आहे, असे खास आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले. आणि या वेळेस जर तुम्ही योग्य पाऊल उचललं नाहीत तर मात्र हे लोकं परिस्थिती अधिक विदारक करतील आणि संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट करतील, असा इशारा देत तेंव्हा वेळ जायच्या आत जागे व्हा ! असे आव्हाहनही राज ठाकरे यांनी दिले.