सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींना पुण्याच्या विशेष न्यायालयाचे समन्स

0

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावला आहे. यामध्ये त्यांना 23 ऑक्टोबरला स्वतः किंवा वकीलमार्फत न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्याचा दाखला देत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी उपरोक्त न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी आता आजी-माजी खासदार-आमदारांविरोधात खटले चालविणाऱ्या विशेष न्यायालयात होणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचे समन्स बजावले आहे.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला असून, त्यात राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकरांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचा आदेश दिला होता. यापूर्वी नाशिक न्यायालयानेही त्यांना याच प्रकरणात समन्स बजावले आहे. नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी दीपाली कडूसकर यांनी राहुल यांना 27 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech