पंतप्रधानांनी घेतले पोहरादेवीचे दर्शन

0

वाशिममध्ये 23 हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

वाशिम – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी राज्याच्या दौऱ्यावर असून विदर्भातील वाशिम येथून त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवी मंदिराज जाऊन पूजा केली. यावेळी मंदिरात त्यांनी पारंपरिक नगारा वाजवून जगदंबेचा आशीर्वाद घेतला. बंजारा समाजाचे श्रद्धांस्थान असलेल्या या मंदिरातील देवीची विशेष पूजा आणि आरतीमध्ये ढोल नगारा वाजवण्याची परंपरा आहे. मंदिरात लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या की नगारा वाजवून कृतज्ञता व्यक्त केली जाते. मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधानांनी नगारा वाजवून जगदंबेचे आशीर्वाद घेतले. यासोबतच त्यांनी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी मोदींनी स्थानिक लोकांशी संवाद साधला आणि मंदिराच्या महत्वाबाबतही चर्चा केली. त्यासोबतच पंतप्रधानांनी वाशिम येथील बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटन केले. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते वाशिममध्ये कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित सुमारे 23 हजार 300 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. वाशिमनंतर मोदींचा ठाणे आणि मुंबई दौरा प्रस्तावित आहे. ठाण्यात पंतप्रधान 32,800 कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. तर मुंबईतील अंदाजे 14,120 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई मेट्रो लाइन-3 च्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) विभागाचे ते उद्घाटन करणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech