सांगली – शरद पवार हे अलिबाबा आणि त्यांच्या भोवती जमलेले गडी हे चाळीस चोर आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. जतमध्ये पोलीस पाटील यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशन व शासन आभार मेळाव्यात ते बोलत होते. खोत पुढे म्हणाले, पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मात्र, आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले. त्यामुळे हे पवारांच्या लक्षात आले की देवेंद्र फडणवीस हे जालीम औषध आहे. फडणवीस एकच गोळी देतात आणि सगळा रोग बरा करतात हे पवारांच्या लक्षात आले आहे. म्हणून सकाळ-संध्याकाळ उठले की सगळे फडणवीस यांच्यावर ते बोलतात. एकप्रकारे पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळ्यांना फडणवीस नावाचा भस्म्या रोगच झाला आहे. या लोकांना देवेंद्र फडणवीसांच्या शिवाय दुसरं काही दिसत नाही, असेही खोत म्हणाले. काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव हे अहमदनगरच ठेवावं, यासाठी मुस्लीम बांधवांनी शरद पवारांसमोर आंदोलन केले होते. यावेळी शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी मुस्लीमांना शरद पवारांचे जावई असे संबोधले होते.