राजकारणाची दिशा बदलणे आता मतदारांच्या हातात – बाळासाहेब थोरात

0

पुणे – ‘राजकारणाची सध्याची दिशा चांगली नाही. ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यांचा निर्णय आता मतदारांच्याच हातात आहे’, असे प्रतिपादन काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे केले. ‘सध्या इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण केले जात आहे, की त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठीही आपली पातळी कमी करावी, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

समाजात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुणे नवरात्रौ महोत्सवात देण्यात येणाऱ्या ‘महर्षी’ पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यंदा महर्षी पुरस्काराने थोरात यांना गौरवण्यात आले. पुणे नवरात्रौ महोत्सवात श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. माजी आमदार व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. ज्येष्ठ वात्रटिकाकार व कवी रामदास फुटाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे आणि सिनेअभिनेते सुनील बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देवीच्या मूर्तीचे सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, पुष्पहार व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

थोरात पुढे म्हणाले, ‘राजकारण, समाजकारणाची पार्श्वभूमी घरातच होती. पुण्यात शिकलो. वकील झालो. पुण्याने मला आत्मविश्वास आणि संधी दिली. माझ्या कारकिर्दीत पुण्याचे मोठे योगदान आहे. महर्षी पुरस्काराने ज्यांना गौरविण्यात आले आहे, त्या महान लोकांच्या यादीत माझे नाव पाहून मला आश्चर्य वाटले, असेही थोरात म्हणाले. कल्पक उपक्रम हे आबा बागुल यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांना पुढील संधी मिळावी, असे मलाही वाटते, असा उल्लेख थोरात यांनी केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech