मुंबई – चेंबूरमधील सिद्धार्थनगर येथे एका घराला भीषण आग लागली. या घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. मृतांमध्ये प्रेसी प्रेम गुप्ता, (6), मंजू प्रेम गुप्ता, (30), अनिता धरमदेव गुप्ता, (39), प्रेम चेदिराम गुप्ता (30), नरेंद्र गुप्ता (10), विधी चेदिराम गुप्ता (15), गीतादेवी धरमदेव गुप्ता (60) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर येथे सिद्धार्थनगर येथील घराला आज, रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागली.
यावेळी घरात सर्व सदस्य होते. गुप्ता परिवारातील सर्व सदस्य असून त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाला सांगण्यात आलं होतं. मात्र, अग्नीशमन दलाचे पथक येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले त्यातच गुप्ता कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान गुप्ता परिवाराला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. आग लागल्यानंतर सगळे घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता आलं नाही. तसंच, सर्व कुटुंब साखरझोपेत असतानाच ही आग लागली.
गुप्ता परिवार राहात असलेले घर हे दोन मजली होते. तळ मजल्याला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किट झाल्यामुळं आग भडकली असावी. तसंच सर्वजण झोपेत असल्यामुळं उशीर झाला व आगीने रौद्ररुप धारण केले. स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.