रत्नागिरी – कितीही अडचणी आल्या तरी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. उलट पंधराशेचे २ हजार करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे ९ तारखेला खात्यावर जमा होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबविण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे प्रमोद महाजन क्रीडा संकुलात मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरवर्षी ४६ हजार कोटींची तरतूद केली आहे. ही योजना बंद व्हावी, म्हणून काहीजण न्यायालयात गेले. शासनाने दिलेले ३ हजार हे महिलांसाठी ३ लाखांसारखे आहेत. या पैशातून महिला स्वत:साठी औषधोपचार करत आहेत. शिवण क्लाससाठी प्रवेश घेत आहेत. त्यातून व्यवसाय वृद्धी करत आहेत. कुटुंबातील सदस्यांवर खर्च करत आहेत. हा त्यांचा आनंद समाधान देऊन जातो. ही योजना महिला भगिनींपर्यंत पोहोचविणाऱ्या अंगणवाडी सेविका, सीआरपी यांना धन्यवाद दिले पाहिजेत. ही योजना ४ लाख महिलांपर्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करून पोहचविणाऱ्या अधिकाऱ्यांनाही धन्यवाद देतो. यावेळी विविध विभागांच्या लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र, धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी ५ हजारांहून अधिक महिला उपस्थित होत्या.