निवडणुकीतील विजयानंतर फारूख अब्दुल्लांची घोषणा
श्रीनगर – जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला 49 जागा मिळाल्या आहेत. विधानसभेच्या 90 जागांपैकी बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता असते. या विजयानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केली.
जम्मू-काश्मिरात तब्बल 10 वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले आहे. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मु्ख्यमंत्री पदाबाबत घोषणा केली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी बडगामधून विजय मिळवल्यानंतर ते मुख्यमंत्री होणार असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले आहे. ओमर अब्दुल्ला हे संपूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री असतील. पॉवर शेअरिंग हा मुद्दा नाही. आम्ही जम्मू-काश्मीरच्या लोकांचे आभारी आहोत, असे फारुख अब्दुल्ला म्हणालेत.
राज्याच्या जनतेने तब्बल 10 वर्षांनंतर आम्हाला जनादेश दिला आहे. आम्ही अल्लाहला प्रार्थना करतो की आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू. इथे पोलिसांचे नाही तर लोकांचे राज्य असेल. तुरुंगात टाकलेल्या निरपराधांना बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता इथे माध्यम स्वातंत्र्य असेल. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. मला आशा आहे की इंडिया आघाडीचे भागीदार येथे राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी आमच्यासोबत उभे राहतील. ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार आहेत. मला दुःख आहे की काँग्रेस हरियाणात जिंकू शकली नाही. कदाचित अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव झाला असावा असे फारूख अब्दुल्ला यांनी सांगितले.