मोदी-शाहांनी महाराष्ट्राला लुटले, काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ लुटीची माहिती राज्यभर पोहचवणार

0

मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले.

सत्तेसाठी भाजपाची कोणाशीही युती, जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबतची युती नरेंद्र मोदी विसरले काय?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत काँग्रेस पक्षाने भाजपा युती सरकारच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा चित्ररथ बनवला आहे. महाभ्रष्ट युती सरकारने मोदी शाह यांच्या आदेशानुसार गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले आहेत. राज्यातील ७.५ लाख कोटी रुपये व ५ लाख रोजगार गुजरातने पळवले आहेत. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी महाराष्ट्राला ATM बनवून कसे लुटले या लुटीची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ करणार असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या चित्ररथाचे (प्रचाररथ) उद्घाटन मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, विधी विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड. रविप्रकाश जाधव, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष युती सरकारने राज्याला लुटले आहे. महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक गुजरातला पळवली व राज्यातील गुतंवणूक व लाखो तरुणांचे रोजगार हिरावले. मोदी शाह यांच्या आदेशाचे पालन करत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी महाराष्ट्राला गुजरातकडे गहाण ठेवले ही माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी अशा प्रकारचे अनेक प्रचार रथ राज्यभर जाऊन जनतेला माहिती देण्याचे काम करतील. गुजरातच्या लाडक्या महाभ्रष्ट युतीच्या गुजरात कनेक्शनचा पर्दाफाश हा प्रचाररथ करेल.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, हरियाणाची व महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस पक्ष आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवतो हे लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे, त्यामुळे काँग्रेसवर काहीही आरोप केलेले सहन केले जाणार नाहीत असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केलेल्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पिडीपी सोबत भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करुन ३.५ वर्षे सत्ता भोगली, त्या मेहबुबा मुफ्ती पाकिस्तानचे समर्थन करतात, नरेंद्र मोदी यांना ती युती चालली ना? भाजपाने सत्तेसाठी कोणा कोणा सोबत युती केली हे त्यांनी आधी पहावे. नरेंद्र मोदी जे बोलतात ते गांभिर्याने घेऊ नका, असेही नाना पटोले म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech