‘हिज्ब-उत-तहरीर’ दहशतवादी संघटनेवर बंदी

0

केंद्रीय गृहमंत्रालयाने केली प्रतिबंधात्मक कारवाई

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने  गुरुवारी पॅन इस्लामिक फुटीरवादी संघटना ‘हिज्ब-उत-तहरीर’वर बंदी घातली आहे. भारताच्या आंतरिक सुरक्षेसाठी ही संघटना धोकादायक ठरत असून त्यामुळे प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने संघटनेवर बंदी घालताना सांगितले की, ही संघटना एक जागतिक पॅन-इस्लामिक कट्टरतावादी संघटना आहे, ज्याची स्थापना 1953 मध्ये जेरुसलेममध्ये झाली होती. या संघटनेला आता सरकारनी प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले आहे. जिहादच्या माध्यमातून लोकशाही सरकार उलथून टाकून भारतासह जागतिक स्तरावर इस्लामिक राज्य आणि खिलाफत स्थापन करणे, हे या जिहादी दहशतवादी संघटनेचे उद्दिष्ट आहे. तसेच ‘हिज्ब-उत-तहरीर’ संघटना आयएसआयएससाठी काम करते. गृह मंत्रालयाने या संघटनेला भारताच्या लोकशाही प्रणाली आणि अंतर्गत सुरक्षेसाठी ‘गंभीर धोका’ म्हटले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले की, निष्पाप तरुणांना इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यास प्रवृत्त करण्यात आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारण्यात हिज्ब-उत-तहरीरचा प्रमुख सहभाग आहे. ही संघटना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ॲप्सद्वारे भोळ्या भाबड्या तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करते. केंद्र सरकारचा असा विश्वास आहे की, हिज्ब-उत-तहरीर संघटनेचा भारतातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये भाग आहे. त्यामुळे सरकारने या संघटनेला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 अंतर्गत प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले आहे.

यापूर्वी, तामिळनाडूतून संघटनेशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या संघटनेच्या ‘नकीब’ आणि ‘आमिर’ फैजुल रहमानला अटक केली. आरोपींनी हिज्ब-उत-तहरीरची विचारधारा विविध गटांमध्ये पसरवण्यासाठी अनेक गुप्त बैठका घेतल्या आणि तमिळनाडूमध्ये फुटीरतावादी मोहिमा केल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech