नवी दिल्ली – ऑगस्ट 2024च्या व्यापार आकडेवारीनुसार तयार कपड्यांच्या (आरएमजी) निर्यातीत 11% वार्षिक वाढ झाली असून भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये लक्षणीय विस्तार होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक आणि निर्यातीला सर्वाधिक प्रोत्साहन देणाऱ्या भारताच्या अंतर्गत क्षमता आणि मजबूत धोरणात्मक चौकटींमुळे या क्षेत्राचा 2030 पर्यंत 350 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत विस्तार होण्याचा अंदाज आहे.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार अनेक योजना आणि धोरणात्मक उपक्रम राबवत आहे. पुढील 3-5 वर्षांत पंतप्रधान मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अॅपरेल (पीएम मित्र) पार्क आणि उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेद्वारे 90,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे, तर राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन सारख्या योजना भारताला तांत्रिक वस्त्र क्षेत्रात जागतिक आघाडीवर नेण्याची अपेक्षा आहे.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथे पीएम मित्र पार्कची पायाभरणी केली. पीएम मित्र पार्क योजनेअंतर्गत देशभरात मंजूर झालेल्या 7 पार्कपैकी हे एक आहे. प्लग अँड प्ले सुविधांसह जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेले पीएम मित्र पार्क भारताला वस्त्रोद्योग गुंतवणूक आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टिने एक प्रमुख पाऊल ठरेल. प्रत्येक पीएम मित्र पार्क पूर्ण झाल्यावर 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करेल आणि जवळपास 1 लाख थेट रोजगार आणि 2 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.