मुंबई – ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. असा स्वस्तात जाणार नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही. पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदान सोडत नाही’, मुख्यमंत्र्यांची दसरा मेळाव्यातून चौफेर फटकेबाजी
‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ही गर्जना करून बाळासाहेब सुरुवात करायचे. तेव्हा माझ्यासकट सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. ही आठवण सर्वांना आहे. गर्व से कहो हम हिंदू है ही सिंह गर्जना बाळासाहेबांनी देशाला दिली’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. पुढे ते म्हणाले, पण काही लोकांना या शब्दाची अलर्जी झाली आहे. हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणताना काही लोकांची जीभ कचरू लागली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला अभिमान वाटतो. पण हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना लाज वाटत आहे.
बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली. त्यामुळे आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे.शेवटच्या टोकापर्यंत हा महासागर पसरला आहे. भगवा उत्साह संचारला असल्याचे शिंदे म्हणाले. तर महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते हे सरकार १५ दिवस टिकणार नाही. एका महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरुन उरला आणि जनतेच्या आशीर्वादाने साथीने घासून नाही घासून पुसून नाही, ठासून दोन वर्ष पूर्ण केली’, असे म्हणत एकनाथ शिंदेनी ठाकरे गटावर जोरदार शाब्दिक टोलेबाजी केली.