मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. सिद्दीकी यांच्यावर भर रस्त्यात गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपींची ओळख पटलेली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.
या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. चौथ्या आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव मोहम्मद जीशान अख्तर असल्याचे मुंबई पोलिसांनी जाहीर केले आहे. या नवीन आरोपीच्या ओळखीने तपासात एक नवा दृष्टिकोन मिळाला असून, पोलिसांनी हत्येचा मास्टरमाइंड कोण, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतल्यामुळे चौकशी अधिक केली जात आहे. या आरोपींना हत्येच्या कटात कोणाची मदत मिळाली का, याचाही तपास केला जात आहे. चौथा आरोपी ओळखला गेल्यामुळे हत्याकांडामागील कारणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी चौथ्या आरोपीचा तपास जलद गतीने सुरू केला आहे आणि तो लवकरात लवकर हाती येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. सिद्दीकी यांच्या हत्येने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची भावना आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे.