‘मराठा-ओबीसी एकोप्यासाठी प्रयत्न करा’- काँग्रेस पक्षश्रेष्ठी

0

महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना विशेष सूचना

नवी दिल्ली : राज्यातील मराठा-ओबीसी संघर्षाचा परिणाम निवडणुकीवर होऊ देऊ नका. दोन्ही समाजाच्या एकोप्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत देण्यात आले. हरियाणा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसोबत दिल्लीत काँग्रेस पक्षनेतृत्वाने चर्चा केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा केली. हरियाणातील निकालाची गंभीर दखल घेत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना गटबाजी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशाराच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिला आहे.

महाराष्ट्राला हरियाणा बनू देणार नाही. मराठा-ओबीसी संघर्षाचा परिणाम महाराष्ट्रातील निवडणुकीवर पडण्याच्या शक्यतेने काँग्रेस नेतृत्व अलर्ट मोडवर आले आहे.काँग्रेस नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना देण्यात आल्यात की, मराठा-ओबीसी यांच्यातील संघर्षत दोन्ही समाजात एकोपा राहील असं प्रयत्न करा. कुठल्याही परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी सरकार आणायचं आहे. या बैठकीत केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना 3 महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यात पहिला आदेश मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, या वादात पडू नका. याबाबत काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल. त्यासाठी पक्षातील नेत्यांनी पक्षांतर्गत गटबाजी अथवा आघाडीत गटबाजी करू नये. दुसऱ्या आदेशात कुठल्याही प्रकारे आघाडीत वादग्रस्त जागांवर चर्चा करू नका.

ज्या जागांबाबत आघाडीत वाद आहे, उद्धव ठाकरे अथवा शरद पवारांचा पक्ष दावा करत असेल तर अशा जागांबाबत केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल. त्यासाठी आघाडीच्या पातळीवर वादाची परिस्थिती बनवू नका. त्याशिवाय तिसऱ्या आदेशात काँग्रेस हायकमांडने जाहिरनाम्यावर चर्चा करू नका अशा सूचना महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्या आहेत. केंद्रीय नेते जाहिरनामा निश्चित करतील, तुम्ही जनतेशी संपर्कात राहून काम करा. जनतेत जाऊन काँग्रेसने केलेल्या कामांची आठवण करून द्या असे निर्देश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech