(अनंत नलावडे)
मुंबई – राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरं जाण्याचा निर्णय तीनही पक्षांनी घेतला असून, जागांचे वाटपही पूर्ण झाले आहे.फक्तं त्याची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत भाजपचे केंद्रीय नेतृत्व करणार असून भाजप १६० जागी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ७८, तरं अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ५० जागी निवडणूक लढवण्याच्या फॉर्मुल्याला तीनही पक्षांच्या राज्यातील नेत्यांनी मान्यता दिल्याची माहिती भाजपतील विश्वसनीय सूत्रांनी मंगळवारी येथे दिली.
या सूत्रांनी यावेळी बोलताना असाही ठाम दावा केला की,महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमूख नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवाती पासूनच आम्हाला ५० पेक्षा जास्त जागा मिळायला हव्यात अशी ठाम भूमिका घेतली होती.त्याचीच ‘ री ‘
ओढत पक्षातील अन्य ज्येष्ठ नेते मग ते छगन भुजबळ असो की प्रफुल्ल पटेल यांनीही ओढली होती.मात्र अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रमूख नेत्यांची आपल्या नेहमीच्या शैलीत समजूत काढली होती.यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व खा.सुनील तटकरे यांना भाजपने केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीचे अध्यक्षपद बहाल तरं केलेच,पण लवकरच राज्यसभेतील अजित पवार यांच्या पत्नी व खा.सूनेत्रा पवार यांनाही केंद्रात एखादे महत्त्वाचे पद देण्याची ऑफर अजित पवार यांना शहा यांनी दिल्याने पवारांसहीत सर्वच नेत्यांनी मवाळ भूमिका घेत आम्ही तूम्ही जे दिले त्यात समाधानी असल्याचे शहा यांना ठामपणे कळविल्याने अखेर जागावाटपाच्या फोर्मुल्यावर त्याच बैठकीत शिक्कामोर्तबच करण्यात आल्याची खास गोपनीय माहितीही या सुत्रांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री शिंदे समाधानी……
खरंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा ग्राफ पाहता सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला किमान १०० जागा तरी मिळाव्या असा आग्रह अमित शहा यांच्याकडे केला होता.मात्र जस जसे निवडणूक अगोदरचे तपशील त्यांना राज्य गुप्तचर यंत्रणांकडून मिळत गेले त्यातून दोन पावलं मागे घेत त्यांना भाजपने दिलेल्या ७८ जागांची ऑफर त्यांनी आनंदाने स्वीकारली. कारण तिघांचेही उद्दिष्ट एकच आहे या निवडणूकीत सत्ता,संपत्ती,याचा पुरेपूर वापर करून कोणत्याही परिस्थितीत निकालानंतर राज्यात पुन्हा सरकार स्थापन करायचेच.या सर्व घडामोडी इतक्या गुप्तपणे झाल्या की आजही प्रदेश भाजपचे सर्वोसर्वा देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,चंद्रकांत पाटील यांना याची कोणतीच खबरबात अद्यापही पोहचलेल्या नाहीत,असाही ठाम दावाही या सूत्रांनी केला.
या सूत्रांनी शेवटी बोलताना असाही दावा केला की,आज विरोधातले महा विकास आघाडीचे प्रमूख नेते उध्दव ठाकरे,शरद पवार,नाना पटोले, उद्याच्या सरकार बद्दल काहीही दावा करीत असेल तरी आघाडी फक्तं ११० ते ११५ पर्यंतच आघाडीवर असतील, मात्र अपक्षांची संख्या १९९५ ची पुनरावृत्ती करतील.ज्यात सर्वाधिक संख्येने भाजप चेच असंतुष्ट आमदार असतील. तरं ज्यांना भाजपने अद्याप काहीही दिलेले नाही असे निष्ठावंत जास्तं प्रमाणात आघाडीतून निवडून येतील व सरकार स्थापन करतेवेळी भाजपच्या एका हाकेवर सरकाराला बाहेरून का होईना खंबीर पाठिंबा देतील. मात्र त्यावेळी राज्यात मुख्यमंत्री असतील ज्येष्ठ भाजप नेते विनोद तावडे तर उपमुख्यमंत्री मात्र दोन असतील त्यात संख्याबलाप्रमाणे अजित पवार व विद्यमान एकनाथ शिंदे हे असतील. त्याहीवेळी शिंदेंकडे नगरविकास तरं अजित पवार यांच्याकडे गृह,अर्थ व नियोजन,उर्जा, व जलसंपदा या खात्याचा अधिभार असेल असेही छातीठोक भाकीत या सूत्रांनी वर्तविले.
………………..
.