नवी दिल्ली – मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द आणि विलंबामुळे विस्तारा विमान कंपनीच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे, सरकारने विस्ताराकडून उड्डाण रद्द करणे आणि विलंब झाल्याबद्दल अहवाल मागवला आहे. वैमानिकांच्या कमतरतेमुळे या विमान कंपनीने आपली उड्डाणे तात्पुरती कमी केली आहेत. गेल्या काही दिवसांत विस्तारा कंपनीने ७० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. विस्ताराचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी वेतन सुधारणेच्या निषेधार्थ वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे विमान कंपनीला उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. अनेक विमानसेवाही विलंबाने सुरू आहेत. विमान रद्द होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. याबाबत विमान कंपनीने प्रवाशांची माफी मागितली आहे.
विस्ताराच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांत विमान कंपनीला वैमानिकांच्या कमतरतेमुळे आणि विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करावी लागली. परिस्थिती पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच नियमित कामकाज पुन्हा सुरू होईल. अलीकडेच एअर इंडिया-विस्ताराच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही विमान कंपन्यांच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाअंतर्गत दोन्ही कंपन्यांच्या वैमानिकांना एकाच पगाराच्या रचनेत आणण्याची तयारी सुरू आहे.