रत्नागिरी : कोकणनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाच्या वेळी अनुचित प्रकार घडल्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली. गेल्या शनिवारी (११ ऑक्टोबर) शहरातील कोकणनगर येथे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन घेण्यात आले होते. या संचलनाच्या वेळी काही अनुचित प्रकार तेथे घडला. त्यानंतर उद्भवलेल्या प्रसंगाच्या वेळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश ऊर्फ बाबू माप, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, विभाग प्रमुख प्रकाश रसाळ, तारक मयेकर, नितीन लिमये आदी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.