अमरावती – सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासन अधिक सतर्कतेने याकडे लक्ष ठेवून असते. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या तोंडावर कर्नाटकातून अमरावतीत आलेला ३५०० किलो भेसळयुक्त खवा ज्याची किंमत अंदाजे दहा लाख रुपये आहे. तो अन्न व औषधी प्रशासनाने छापा टाकून जप्त केला.
अन्न व औषधी प्रशासन या प्रकरणी कारवाई करत असून नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कर्नाटक व गुजरात राज्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध व भेसळयुक्त अन्नपदार्थ शहरात पोहोचल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांना मिळताच गुरुवारी अन्न व औषधी प्रशासनाने शहरातील जुना बायपास मार्गावरील भागातील चैतन्य कॉलनीतील दिनेश रामराव नागपुरे यांच्या गोदामावर छापा टाकून सहआयुक्त रामभाऊ चौव्हाण यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी, जिल्हा दुग्ध विभागाचे विनोद पाठक, पशुधन विकास अधिकारी तुषार गावंडे, तसेच फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.