जयपूर – राजस्थानच्या जयपूर येथे कोजागिरी साजरी करणारे स्वयंसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांवर गुरुवारी 17 ऑक्टोबरच्या रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात 10 स्वयंसेवक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नसीब चौधरी आणि त्याच्या मुलाला अटक केलीय. तर हल्लेखोर जमावातील इतर लोक फरार आहेत. यासंदर्भात करणी विहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी रात्री 10 वाजता जागरण कार्यक्रम होता. यानंतर खीरीचा प्रसाद वाटण्यात आला. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या दोघांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला.
यावेळी त्याने भाविकांशी कडाक्याचे भांडण केले आणि शिविगाळ केली. त्यानंतर आपल्या साथीदारांना बोलावून भाविकांवर चाकूने हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी स्वयंसेवकांच्या पोटावर आणि छातीवर चाकूचे वार केलेत. यात 10 स्वयंसेवक जखमी झालेत. जखमींना एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये शंकर बागरा, मुरारीलाल, राम पारीक, लखन सिंग जदौन, पुष्पेंद्र आणि दिनेश शर्मा यांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दिल्ली-अजमेर महामार्गही रोखून धरला. सल्लामसलत केल्यानंतर रात्री 1.30 वाजेच्या सुमारास पोलिसांनी चक्का जाम मिटवला. हल्लेखोर नसीब चौधरी आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, इतर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी घटनास्थळी शांतता असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.