नवी दिल्ली – मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर केलाय. जैन यांना तब्बल 18 महिन्यांनी जामीन मिळाला आहे. परंतु, जैन यांना देश सोडून जाता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केलेय. ईडीने सत्येंद्र जैन यांच्या जामिनाला विरोध केला होता, 18 महिने शिक्षा भोगल्याचे कारण देत न्यायालयाने 50 हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जैन यांना जामीन दिला. आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना मे 2022 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. जैन यांना गेल्या वर्षी मे महिन्यात आरोग्याच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला होता. ते 10 महिने जामीनावर बाहेर होते, मात्र या वर्षी मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. त्यानुसार 18 मार्च रोजी त्यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले.
त्यानंतर आता अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सत्येंद्र जैन यांना मिळालेला जामीन पक्षासाठी दिलासा देणारा आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असतानाच हा जामीन मंजूर करण्यात आल्याने पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, सत्येंद्र जैन यांच्यापूर्वी आपचे सर्व बडे नेते तुरुंगातून बाहेर आले आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना न्यायालयाकडून यापूर्वीच जामीन मिळाला आहे.