हायकोर्टाच्या आदेशानंतर बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल

0

मुंबई : सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा याच्यासह त्याची पत्नी, फेम प्रोडक्शन कंपनी यांच्यासह आठ जणांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वसई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी व्हि अनबिटेबल डान्स ग्रुप यांची ११ कोटी ९६ लाख १० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा 3 चे पोलीस निरीक्षक शाहुराज रणावरे करीत आहेत. व्हि अनबिटेबल डान्स ग्रुपची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. त्यावर कारवाई होत नसल्याने डान्सग्रुपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांनी तपास करून चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखा वसई युनिटचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी तपास करून अहवाल सादर केला.

त्यानंतर मीरारोड पोलीस ठाण्यात बॉलिवूड रेमो डिसुझावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईंदरमध्ये राहणारे डान्सर विर नरोत्तम यांची ओळख ओमप्रकाश चौहान यांच्याशी 2014 साली झाली होती. तेव्हा त्यांनी मी एक इन्स्टाग्राम स्टार आहे. त्यावर तुमचे व्हिडीओ अपलोड करतो. त्यातून चांगले टीव्ही-शो मिळतील असे सांगितले होते. त्यावेळी तक्रारदार यांच्यासह 26 डान्सर कलाकार यांचा मॅनेजर म्हणून चौहान यांची नियुक्ती केली होती. हे सर्व 8 ते 20 वर्ष वयोगटातील होते. त्यातून ते स्टेज शो, डान्स शो, रियालिटी शो याचे आयोजन होत होते.

मुंबईमध्ये सन 2018 ला डान्स प्लस रियालिटी शो सिजन – 4 या शो मध्ये ग्रुप धर्मेश येलांडे यांच्या टिममध्ये होता. तेव्हा एक असिस्टंट कोरियोग्राफर रोहीत जाधव हा त्यांना देण्यात आला होता. त्या शोमध्ये पाच लाखाचे बक्षीस ठरले होते. तर प्रोडेक्शनने रुपये 100 व 1000 चे व्हाऊचर दिले होते. त्याची रक्कम आणि व्हाऊचरचे ओमप्रकाश यांनी वाटप केले नाही. तेव्हा 35 डान्सर होते व सदर शो करीता 38 दिवस शूटिंग केले होते. त्यावेळी प्रत्येक आर्टीस्ट साठी 7 हजार प्रती दिवस पगार दिला जात असे. सदर फ्रेम प्रोडक्शन यांनी 35 डान्सरचा प्रती दिवसाचा पगार असा एकुण 93 लाख 10 हजार देणे आवश्यक होते.परंतु ते दिलेले नाहीत,असे तक्रारीत म्हटले होते.

तसेच सदर शोचे जज रेमो डिसुझा होते. ते या डान्सर कलाकारांच्या जीवनावर चित्रपट काढणार असल्याचे सांगून ना-हरकत आणि सह्या घेण्यात आला होता. सदर चित्रपट पूर्ण झाल्यानंतर ५० लाख देणार असल्याचा करारनामा केला होता. त्यात रेमो डीसुजा आणि त्यांची पत्नी लिझेल डिसोझा यांनी ५ लाख ११ हजार दिले होते. त्याचेही पैसे चौहान यांनी दिले नाहीत. जानेवारी २०२३ मध्ये दुबईमध्ये ग्लोबल व्हिलेज हा एक महिण्याचा शो केला होता. त्यात ४५ सदस्य गेले होते. नमुद शो मध्ये ७५ शो केले होते. त्याकरीता २ लाख ८८ हजार डॉलर इतकी रक्कम डान्स ग्रुपला मिळाली होती. त्यापैकी आमच्या ग्रुपमधील २५ कलाकारांना प्रत्येकी १ लाख ४० हजार इतकी रक्कम वाटप करुन बाकीची रक्कम चौहान याने स्वतः कडेच ठेवली होती,असे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी रेमो डिसोझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिझोझा, ओमप्रकाश चौहान, रोहित जाधव, फेम प्रोडक्शन कंपनी, रमेश गुप्ता यांच्यासह एका पोलीस कर्मचार्‍याच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणूक केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या ३२३, ४१९, ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१ व १२० (बी), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास आता गुन्हे शाखा वसई शाखेचे वरिष्ठ शाहुराज रणावरे हे करत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech