मुंबई – माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा पत्रात एकाच कुटुंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणाऱ्याला तिसऱ्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही, असे म्हटले आहे. यामुळे कोकणातील गडाला उद्धव ठाकरे यांनी भगदाड पाडल्याची चर्चा आहे. दरम्यान त्यांनी मुंबईत मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. त्या निमित्ताने ते अनेक वर्षांनी स्वगृही परतले.
राजन तेली यांच्या पक्षप्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री ठाकरे, गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेत आज पाच पक्षप्रवेश झाले आहेत. चांगले कार्यकर्ते, माणसं शिवसेनेत येत आहेत. राजन तेली आमचाच. पण मधल्या काळात त्याची दिशाभूल झाली होती. मात्र, आपण ज्या दिशेत जात आहोत ती आपली दिशा नाही हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे तो स्वगृही आला आहे. राजन जसे आले तसे दिशा बदलून इकडे तिकडे गेलेले ते मोठ्या संख्येने इकडे येत आहेत. राज्यातील वातावरण बदलायला लागले आहे, असे मी म्हणणार नाही ते बदलले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणणार हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवले आहे. कोकण आणि शिवसेना हे एक जीव आहेत. शिवसेनेला कोकणापासून आणि कोकणापासून शिवसेनेला कोणी तोडू शकत नाही, ही येणारी निवडणूक दाखवून देईल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे, भाजपा पक्षात प्रवेश केलेल्या राणे कुटुंबियांचा अंतर्गत होत असलेला त्रास, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक २०१९ ची विधानसभा निवडणूक यामध्ये माझा पराभव करण्यासाठी पक्षांतर्गत विरोधक निर्माण करणे (यासाठी साम दाम, दंड, भेद यांचा वापर करणे) पूर्वीच्या या सर्व त्रासाला कंटाळून मी भाजप पक्षात प्रवेश करून पक्ष संघटना वाढीसाठी काम केले. फक्त बांदा शहरापुरती मर्यादित असलेली भाजपा संपूर्ण सावंतवाडी मतदार संघात वाढविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन अतोनात परिश्रम केले. परंतु, पुन्हा राणे कुटुंबिय भाजपा पक्षात दाखल होऊन आमचे खच्चीकरण करण्याचा, तसेच त्यांच्यापासून दूर गेलेल्या सर्वांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित आहे.
मी घोटगे सारख्या अत्यंत ग्रामीण भागात सामान्य कुटुंबात जन्मलो. कष्टाने माझी राजकीय कारकिर्द घडवली. ज्या राजकीय पक्षात गेलो, तिथे शंभर टक्के प्रामाणिकपणे काम केले, स्वतःच्या मेहनतीने माणसे जोडली. पण एकाच कुटुंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणारा तिसरा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही. याबाबत सातत्याने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेले होते. त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही यामध्ये वरिष्ठांचा नाइलाजही असू शकतो. हे मी समजू शकतो.